मुंबई डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे राज्यात आजपासून (दि. 28) पुन्हा कडक निर्बंध लागू होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्या निर्बंधांशी संबंधित विविध बाबींचे स्पष्टीकरण दिले आहे. चौथ्या स्तरात रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड हे जिल्हे येत असून, या जिल्ह्यांत निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये पुन्हा एकदा वाढ करताना जमाव व मेळावे, धार्मिक स्थळ, खासगी प्रशिक्षण वर्ग, कौशल्य केंद्रे, हॉटेल, पर्यटनस्थळांसंदर्भात काही क्षेत्रांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. जेणेकरून निर्बंधांची अंमलबजावणी करताना नागरिक अथवा प्रशासनात गैरसमज होणार नाहीत व नियमांबाबत स्पष्टता येईल. सध्या महाराष्ट्र किमान तिसऱ्या स्तरात असणार आहे. तर स्थानिक प्रशासन व जिल्हाधिकारी आपापल्या जिल्ह्यांचा स्तर ठरवून निर्बंध कमी अधिक करतील.

राज्यातील दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर राज्य सरकारने लावलेले कडक निर्बंध उठवताना पाच स्तर (लेव्हल्स) M होते. आता मात्र राज्यात स्तर तीनच्या वरचे स्तर असतील. स्तर तीनच्या वर मोडणाऱ्या स्तरासाठी जमावबंदी असणार आहे. स्तर तीन, चार आणि पाच येथील जमाव अथवा मेळाव्यांवर पूर्णपणे बंदी असेल. एका ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. लग्न समारंभ, पार्टी, निवडणुका, प्रचार, सोसायटी बैठका, धार्मिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक कार्यक्रम, क्रीडा सामने, सामाजिक कार्यक्रम आदींसाठी 100 पेक्षा जास्त लोकांच्या जमावावर बंदी असणार आहे, असे आपत्ती व व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे.

बांधकाम होत असलेल्या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त संख्येने काम करता येणार नाही. खुल्या जागेच्या ठिकाणीही क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना काम करता येणार नाही. कोणत्याही संमेलन अथवा मेळाव्याचा कालावधी तीन तासांपेक्षा जास्त असू शकणार नाही. स्तर तीन, चार आणि पाचमध्ये सर्व धार्मिक स्थळे बंद असतील. शाळा, महाविद्यालये किंवा इतर शैक्षणिक संस्थांसाठी असलेले नियम खासगी प्रशिक्षण वर्ग म्हणजेच कोचिंग क्लासेस आणि कौशल्य केंद्रांसाठी लागू असतील.

तिसऱ्या स्तरात सध्या 30 जिल्हे

पुणे, अहमदनगर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशीम, यवतमाळ, हिंगोली, नंदुरबार, अकोला, औरंगाबाद, बीड, बुलडाणा, गडचिरोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, सोलापूर आणि ठाणे.

चौथ्या स्तरात सध्या 6 जिल्हे

कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड. पाचव्या स्तरात सध्या राज्यातील एकही जिल्हा नाही. तर पहिला आणि दुसरा स्तर यापुढे अस्तित्वात नसेल.

असे असतील निर्बंध

अत्यावश्यक दुकाने – दररोज दुपारी 4 वाजेपर्यंत.

इतर दुकाने – दुपारी 4 वाजेपर्यंत. मात्र, शनिवार, रविवार पूर्णपणे बंद राहतील.

सिनेमागृह, मॉल्स – पूर्णपणे बंद.

हॉटेल – दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार (शनिवार, रविवार बंद). पार्सल, होम डिलिव्हरी सेवा सुरू राहील.

उद्याने, मैदाने, जॉगिंग – पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत सुरू.

सरकारी, खासगी कार्यालये – 50 टक्के क्षमतेने (खासगी आस्थापनांनी सरकारने घालून दिलेले सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक, तरच परवानगी).

चित्रीकरण – बायो बबल वातावरणात परवानगी. संध्याकाळी 5 वाजल्यानंतर बाहेर जाण्यास परवानगी नाही.

सार्वजनिक वाहतूक – 100 टक्के क्षमतेने सुरू. मात्र, उभे राहून प्रवास करण्यास मनाई.

जिम, सलून, स्पा – दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील.

लग्न – हॉलच्या 50 टक्के क्षमतेत, तर जास्तीत जास्त 100 लोकांची उपस्थिती.

अंत्यसंस्कार – 20 लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यास परवानगी.