रत्नागिरी : शहरालगतच्या मिरजोळे औद्योगिक वसाहतीत घोरपडींचे वास्तव्य आढळून आले आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीत आढळणार्‍या घोरपडींचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. असे असताना शहरी वस्तीलगत त्यातही एमआयडीसी क्षेत्रात घोरपडींचा वावर असल्याचे पाहायला मिळाले आहे.

जे. के. फाईल्स ते फिनोलेक्स व्यवस्थापक अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यालगत असणार्‍या जुन्या आंबा बागांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये अनेकदा छोट्या छोट्या घोरपडींचे दर्शन या आधीही अनेकदा घडले आहे.

शुक्रवारी दुपार 2 च्या सुमारास गद्रे कंपनीला लागून अससेल्या आंबा बागेतील एका आंब्याच्या पडलेल्या वृक्षाच्या खोडावर उन्हात विसावलेली बर्‍यापैकी मोठ्या आकाराची घोरपड नजीकच्या रहिवाशांच्या निदर्शनास आली.

बाजूलाच राहणार्‍या गृहनिर्माण सोसायटीतील मुलांनी ही घोरपड पाहिली. माणसांची चाहूल लागताच ही घोरपड चपळाईने बाजुला असलेल्या गटारवजा नाल्यातील बांधामधील बिळात गायब झाली.