भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे यांचा आरोप
दापोली- दापोली नगरपंचायतीची केळसकर नाका येथे म्युनिसिपल डिस्पेन्सरीसाठी बांधण्यात आलेली इमारत खाजगी कोव्हिड सेंटरसाठी भाड्याने देण्यासाठी नगरपंचायतीमधील सत्ताधारी व्यक्तिगत स्वार्थासाठी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे यांनी ऑनलाईन पत्रकारपरिषदेत बोलताना केला आहे.
याबाबत बोलताना केदार साठे म्हणाले की, कोविडचा प्रसार दापोली तालुक्यात वाढत असून आजच दापोली तालुक्यातील रुग्णांनाही दापोलीत उपचारासाठी बेडसची संख्या कमी पडत आहे. यामुळे वेळीच रुग्णांवर उपचार होण्यासाठी व त्यांना दापोलीबाहेर उपचारासाठी जाता लागू नये यासाठी दापोलीतील स्वामी समर्थ मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचे वतीने दापोली नगरपंचायतीची केळसकर नाका येथील म्युनिसिपल डिस्पेनसरीसाठी बांधण्यात आलेली इमारत खाजगी कोविड सेंटर सुरु करण्यासाठी भाड्याने मीळावी यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडे ७ एप्रिल रोजी एका अर्जाद्वारे मागणी करण्यात आली होती. स्वामी समर्थ मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या अर्जावर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी दापोलीच्या नगराध्यक्षांनी काल (ता.10) रोजी ऑनलाईन खास सभा बोलावली होती. मात्र ती रद्द करण्यात आली. या सभेला उपस्थित असलेले काही नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्यात झालेल्या चर्चेनुसार हा विषयावर वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन मागविण्यात यावे असे ठरविण्यात आले तसेच 14 एप्रिलपर्यंत खाजगी कोविड सेंटर सुरु करण्यासाठी इतर रुग्णालयाकडून अर्ज मागविण्यात यावा यासाठी जाहिरात देण्यात यावी असेही यावेळी ठरविण्यात आले.
या संदर्भात बोलताना केदार साठे म्हणाले की, कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी कळंबणीमधील उपजिल्हा रुग्णालयात जागा नाही, मंडणगडचेही रुग्ण दापोलीत उपचारासाठी येत आहेत. दापोलीतील खाजगी कोविड सेंटरमध्येही जागा नाही. दापोली तालुक्यातही कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. या स्थितीत ज्या रुग्णालयाने दापोली नगरपंचायतीची इमारत कोविड सेंटर सुरु करण्यासाठी भाड्याने मागीतली आहे. दापोली नगरपंचायत प्रशासन व सत्ताधार्यांनी स्वामी समर्थ रुग्णालय किंवा अन्य कोणत्याही रुग्णालयाच्या संचालकांशी संपर्क साधून जेवढ्या लवकर नगरपंचायतीच्या म्युनिसिपल डिस्पेन्सरीच्या इमारतीची जागा तातडीने देणे गरजेचे होते. त्यामुळे दापेालीतील रुग्णांना मोठया शहराच्या ठिकाणी उपचारासाठी जायला लागले नसते. मात्र दापोली नगरपंचायतीच्या सत्ताधार्यांनी स्वत:चे वैयक्तिक स्वार्थ, हितसंबंध, वेगळी गणिते जपण्यासाठी कालच्या सभेत हा निर्णय झाला नाही व हा विषय 14 एप्रिलपर्यंत पुढे गेला आहे. 14 एप्रिल पर्यंत रुग्णालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज दाखल होतील त्यानंतर या अर्जावर विचार करण्यासाठी विशेष सभा बोलावली जाईल त्यात इमरतीच्या भाड्याचे दर ठरतील व त्यानंतर कधीतरी याला मंजूरी मिळेल या सर्व प्रक्रियेला विलंब होणार आहे. या इमारतीपासून उत्पन्न किती मिळणार हे महत्वाचे नसून दापोलीकरांचे प्राण वाचविणे हे सदयस्थितीत महत्वाचे असून याकडे सत्ताधार्यांनी लक्ष देणे गरजेचे होते. सत्ताधार्यांच्या स्वार्थी कारभाराचा पुन्हा एकदा फटका दापोलीकरांना बसणार आहे. हा विषय आता एक दीड आठवडा पुढे गेल्याने गंभीर रुग्ण हलवायचे कोठे असा प्रश्न आता उभा राहणार आहे. आम्ही जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी दापोली व तहसीलदार दापोली यांना विनंती करतो की कोविड काळात त्यांना मिळालेल्या विशेष अधिकाराचा वापर करुन तातडीने ही इमारत अधिग्रहीत करुन त्यांना जे रुग्णालय उचित वाटेल त्यांना ही इमारत कोविड सेंटरसाठी देण्यात यावी अशी मागणी आपण भाजपाच्या वतीने करत आहोत.उद्या (ता.12) रोजी यासंदर्भात आम्ही दापोलीचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची भेट घेणार आहोत. या पत्रकारपरिषदेला भटके विमुक्त आघाडीचे कोकण विभाग संयोजक श्रीराम इदाते, जिल्हा चिटणीस संजय सावंत, दापेाली तालुका आयटीसेलचे अध्यक्ष प्रसाद मांडवकर, दापोली शहराध्यक्ष संदीप केळकर आदी उपस्थित होते.