मुंबई – राज्यातील सर्व दुकाने उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक झाली आहे. या बैठकीत कॅट या व्यापारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया यांनी सांगितले की, सर्व प्रकारची दुकाने उघडायला हवीत. हवे तर खासगी कार्यालयांची वेळ वेगळी ठेवा, सरकारी कार्यालयांची वेळ वेगळी ठेवा. मात्र, कुठल्याही परिस्थितीत व्यापार सुरू व्हायला हवा. राज्यातील सर्व प्रकारच्या व्यापारी संघटनांनी त्यांची भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. व्यापारी अत्यंत मेटाकुटीला आले असून दुकाने उघडण्याची परवानगी देणे आवश्यक आहे, असे आर्जव पदाधिकाऱ्यांनी केले. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, या सर्व प्रश्नावर मी अत्यंत गांभीर्याने विचार करतो. मला दोन दिवसांचा अवधी द्या. काही जबाबदारी व्यापाऱ्यांनी घ्यावी, काही सरकार घेईल. आपल्याला सर्वांनी मिळून कोरोनाचा सामना करायचा आहे. आपण सर्वांनी या संकट समयी आणि युद्धात एकत्र असायला हवे, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे येत्या दोन दिवसात राज्यातील सर्व दुकाने सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Advt.