रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण व अन्य प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिवसेना नेत्यांनी गुरूवारी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची दिल्लीत सदिच्छा भेट घेतली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल, असे या वेळी ना. नितीन गडकरी यांनी सांगितले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या बहुतांशी भागातील चौपदरीकरणाचे काम अद्यापही बंद आहे. ठेकेदार कंपनी बदलूनही या कामात फारशी सुधारणा झालेली नाही.

कोकणातील राष्ट्रीय महामार्गांचे प्रलंबित प्रश्न, रस्त्यांचे प्रकल्प, विविध विकास कामांसंदर्भातील निवेदन ना. नितीन गडकरी यांना देण्यात आले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत, शिवसेनेचे सचिव खा. विनायक राऊत, सुप्रसिद्ध उद्योजक किरण ऊर्फ भैया सामंत आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.