नवी दिल्ली: देशात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढला असून तीन महिन्यानंतर प्रथमच चोवीस तासांत ३९ हजार ७२६ रुग्ण आढळले. १५४ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २५ हजार ६८१ नवे रुग्ण आढळले. तर, पंजाबमध्ये २३६९ आणि केरळमध्ये १८९९ नवे रुग्ण आढळले. या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये शाळा-महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली असून मुंबईत मॉलमध्ये प्रवेशापूर्वी लोकांना रॅपिड अँटिजन टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात खासगी कार्यालयांतही ५० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी दिली जाणार नाही. यात आरोग्य व अत्यावश्यक सेवांना सूट असेल. या राज्यात कोरोना रुग्णांसाठी सध्या १२,७३८ बेड असून त्यातील ६,२३७ शिल्लक आहेत.