दीक्षा इंगवले हत्या की आत्महत्या ; गूढ कायम

रत्नागिरी : शहरातील भगवती किल्ल्यावरून खोल दरीत पडलेल्या दीक्षा इंगवले या तरुणीच्या मृत्यू मागचं कारण स्पष्ट होत नसताना, ती एक इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये ती आयुष्य संपवण्याच्या गोष्टींबद्दल बोलत आहे. यात तिने आई, वडिलांवर प्रेम करणं कधीच थांबवणार नसल्याचंही म्हटलं आहे. तिची इन्स्टा पोस्ट जर गंभीरपणे घेतली गेली असती तर कदाचीत ती वाचू शकली असती असंही बोललं जात आहे.

दिनांक १ मार्च रोजी दिक्षाचा मृतदेह भगवती किल्याखालील खडकात सापडला होता. यानंतर ही आत्महत्या की हत्या असे प्रश्न पुढे आले होते. दिक्षाचा मोबाईल देखील आजवर सापडला नसल्यानं संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. दीक्षा या ठिकाणी कशी पोहचली? तिच्यासोबत अन्य कुणी होते काय? असे प्रश्न समोर आले होते.

मात्र आता दीक्षाच्या मित्रवर्गातून दिक्षाची एक इन्स्टाग्राम पोस्ट पुढे आली आहे, जी तिने आपल्या मृत्यूआधी पोस्ट केली आहे, असे बोलले जात आहे. या पोस्टमध्ये दिक्षाने आपला फोटो शेअर केला असून त्याखाली एक मेसेज लिहिला आहे. त्यामध्ये तिने असे म्हटलंय की,

दीक्षाची व्हायरल इन्स्टाग्राम पोस्ट

मी माझ्या आई वडिलांवर प्रेम करणं कधीच थांबवणार नाही, जरी मला शिवीगाळ केली, वाईट शब्द व वाईट वागणूक दिली तरीही, पण अशी एक वेळ असते जेव्हा स्वतःचं आयुष्य संपवावं लागतं. लव यु ऑल गुडबाय फॉरएव्हर.

या मेसेजमुळे आणखी काही गोष्टी पुढे आल्या आहेत. दीक्षा मागील काही दिवसांपासून तणावाखाली होती असे तिच्या मित्रांमध्ये बोलले जात आहे. दिक्षाचा मोबाईल नेमका कुठे आहे ? याबाबत देखील उलगडा झालेला नाही. आता ही पोस्ट पोलीसांकडून तपासली जात आहे.