चिपळूण : कोयना जलविद्युत प्रकल्पातील पाणी मुंबईला वळविण्याच्या चर्चेमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी सभापती तथा पर्यावरणप्रेमी शौकत मुकादम यांनी आक्रमक भूमिका घेत या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
मुंबईची तहान भागविण्यासाठी कोकणचा घसा कोरडा करू नका, कोकणचे पाणी कोकणच्या जनतेसाठीच राखले गेले पाहिजे, असे ठणकावून सांगतानाच स्थानिक जनतेच्या पाण्याच्या हक्कावर गदा आणणाऱ्या निर्णयाला लोकशाही मार्गाने विरोध करण्याचा इशारा मुकादम यांनी दिला आहे.
कोयना धरणातील पाणी वळविल्यास त्याचा थेट परिणाम नदीप्रवाहावर होऊन वाशिष्ठी नदीच्या पाणी उपलब्धतेवर संकट येण्याची शक्यता आहे. वाशिष्ठी नदीवर चिपळूण शहरासह तालुक्यातील अनेक गावांच्या जॅकवेल, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, नदीकाठची शेती आणि औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत.
त्यामुळे भविष्यात चिपळूणसह कोकणातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. तसेच, चिपळूण रेल्वे स्थानकावर परराज्यांतून येणाऱ्या गाड्या पाणी भरण्यासाठी थांबतात, त्यामुळे रेल्वेच्या पाणीपुरवठ्याचाही विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
या समस्येवर पर्याय सुचविताना मुकादम यांनी मुंबईच्या समुद्रकिनारी खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून गोडे पाणी निर्माण करणारे प्रकल्प उभारण्याची मागणी केली आहे.
आखाती देशांमध्ये कमी पाऊस असूनही समुद्रजल शुद्धीकरणाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाते, तर मग मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर असे प्रकल्प का सुरू करू नयेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कोयनेचे पाणी वळविण्यापूर्वी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पाण्याच्या हक्कांचा, वाशिष्ठी नदीच्या पाणी उपलब्धतेचा, स्थानिक जॅकवेल, शेती आणि गावांच्या पाणीपुरवठ्याचा सखोल अभ्यास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रस्तावावरून मुकादम यांनी प्रशासनासमोर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. चिपळूण शहर आणि तालुक्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था अद्याप झाली आहे का, तसेच वाशिष्ठी नदीवर अवलंबून असलेल्या जॅकवेल आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य काय असणार, अशी विचारणा त्यांनी केली आहे.
नदीचे पाणी मुंबईला वळविल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, नदीकाठच्या शेतीला आणि शेतकऱ्यांना आवश्यक पाणी कसे मिळणार आणि चिपळूणच्या औद्योगिक वसाहतींना भविष्यात पाणीपुरवठा कसा केला जाणार, असे सवालही त्यांनी केले आहेत.
प्रस्तावित योजनेचा पर्यावरणीय अभ्यास, जलउपलब्धता आणि स्थानिक नागरिकांची मते विचारात घेतली आहेत का, तसेच चिपळूण-कराड रेल्वेमार्गाचे भूमिपूजन होऊनही काम अद्याप रखडलेले असताना स्थानिक विकासाच्या प्रश्नांपेक्षा पाणी मुंबईला नेण्याची चर्चा कशासाठी सुरू आहे, असा रोखठोक प्रश्न मुकादम यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply