दापोली : येथील उपजिल्हा रुग्णालयातील महाडायलिसिस केंद्रातील सेवा आवश्यक साहित्याची अनुपलब्धता आणि निधीअभावी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली होती.
या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे डायलिसिसवर अवलंबून असलेल्या गंभीर रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. प्रशासनाने केवळ पत्रक काढून दिलगिरी व्यक्त केली आणि रुग्णांना पर्यायी व्यवस्था करण्याचे आवाहन केले होते.
या संतापजनक प्रकारावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख ऋषी गुजर यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. रुग्णांच्या आरोग्याशी आणि जिवाशी सुरू असलेला हा खेळ अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असे सुनावत ऋषी गुजर यांनी प्रशासनाला थेट धारेवर धरले.

तसेच, ही जीवनरक्षक डायलिसिस सेवा तत्काळ पूर्ववत न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा स्पष्ट आणि कठोर इशारा त्यांनी दिला.
त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आणि निर्माण झालेल्या तगड्या दबावामुळे रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले. रुग्णांचा वाढता रोष आणि ऋषी गुजर यांच्या आंदोलनाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवली आणि अवघ्या काही तासांतच, म्हणजेच आज दुपारी ३ वाजल्यापासून बंद पडलेली डायलिसिस सेवा पुन्हा सुरू केली.
ऋषी गुजर यांनी रुग्णांच्या हितासाठी घेतलेल्या या ठाम भूमिकेमुळेच ही सेवा तातडीने पूर्ववत झाल्याचे स्पष्ट झाले असून, या वेगवान घडामोडींमुळे अनेक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply