रत्नागिरी : शहरातील के. सी. जैन नगर परिसरातील महालक्ष्मी मिनी मॉलला लागलेल्या भीषण आगीने आता अत्यंत रौद्र रूप धारण केले असून, गेल्या तीन तासांपासून या ठिकाणी भयंकर अग्नीतांडव सुरूच आहे.
ही आग केवळ मॉलपुरती मर्यादित न राहता आसपासची दुकाने आणि कार्यालयांमध्ये वेगाने पसरत चालली आहे. मॉलमधून भडकलेल्या या आगीने शेजारीच असलेल्या ‘दैनिक सागर’ या वृत्तपत्राच्या कार्यालयाला आपल्या कचाट्यात घेतले असून इमारतीच्या मागील बाजूच्या कार्यालयांमध्येही आगीच्या ज्वाळा पोहोचल्या आहेत.

आगीची तीव्रता इतकी मोठी आहे की, तिच्या प्रचंड लोटांमुळे परिसरातील इतर व्यापारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची एकच पळापळ झाली.
या व्यावसायिक संकुलामध्ये मागील बाजूस अनेक महत्त्वाची कार्यालये आणि छोटी-मोठी दुकाने आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यालयही याच इमारतीत आहे. इमारतीच्या मागील बाजूला आग वेगाने पसरत असल्याने महिला पतसंस्थेचे कार्यालय तसेच इतर दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची गंभीर भीती निर्माण झाली असून, आतील महत्त्वाचे दस्तऐवज आणि साहित्याबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
आगीची भीषणता पाहता नगरपालिकेसह नजीकच्या एमआयडीसी, फिनोलेक्स कंपनीचे अतिरिक्त बंब मागवण्यात आले आहेत. घटनास्थळी आतापर्यंत तब्बल 4 ते 5 अग्निशामक बंब दाखल झाले. आग विझवण्याच्या या मोहिमेत प्रशासनाला काही वेळ पाण्याची कमतरताही जाणवली.
इमारतीतील प्लास्टिक, कपडे आणि इतर ज्वलनशील साहित्यामुळे आग आटोक्यात आणण्यात मोठे अडथळे येत असून, आग काही प्रमाणात विझवली तरी ती पुन्हा पुन्हा पेट घेत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

या भीषण आगीमध्ये मॉलसह आसपासच्या मालमत्तांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मात्र, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेचे आणि अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सातत्याने सुरूच आहेत.
सध्या स्थानिक प्रशासन, पोलीस आणि नागरिक घटनास्थळी बचावकार्यात गुंतले असून संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply