रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

रत्नागिरी रेल्वे स्थानकात पे अँड पार्किंगचा मनमानी कारभार; प्रवाशांची उघड लूट थांबवण्याची नागरिकांची मागणी

रत्नागिरी रेल्वे स्थानकात पे अँड पार्किंगचा मनमानी कारभार; प्रवाशांची उघड लूट थांबवण्याची नागरिकांची मागणी

रत्नागिरी : रेल्वे स्थानकाचे रूपडे अलीकडेच पालटले असून प्रवाशांना एक सुंदर स्थानक उपलब्ध झाले आहे. मात्र, सध्या येथील पे अँड पार्किंगच्या मनमानी कारभारामुळे प्रवासी आणि त्यांचे नातेवाईक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

स्थानक परिसरात कुठेही गाडी उभी केल्याबरोबर पे अँड पार्किंगचे कर्मचारी तत्काळ पैसे वसूल करण्यासाठी धावून येतात, असा संतापजनक अनुभव नागरिकांना दररोज येत आहे.

पूर्वी स्थानकावर येणाऱ्या वृद्ध, आजारी प्रवाशांना आणि नातेवाईकांना सोडण्यासाठी आतील रस्त्यावर काही वेळ गाडी थांबवण्याची सोय होती.

मात्र, आता या रस्त्यावर दुभाजक (डिव्हायडर) टाकण्यात आल्याने तेथे गाडी थांबवणे पूर्णपणे अशक्य झाले आहे. अवघ्या दोन मिनिटांसाठी नातेवाईकांना स्थानकात सोडायला आलेल्या नागरिकांनाही सक्तीने पार्किंगचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

पार्किंगचे पैसे भरायचे नसल्यास नागरिकांना नाईलाजाने आपल्या गाड्या स्थानकाबाहेर मुख्य रस्त्यावर बऱ्याच लांब अंतरावर उभ्या कराव्या लागत आहेत, ज्यामुळे प्रवाशांची आणि विशेषतः वयोवृद्धांची मोठी गैरसोय होत आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी कोणतीही मोफत पार्किंग व्यवस्था किंवा ‘ड्रॉप अँड गो’ सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही.

स्थानक परिसरात सर्वच ठिकाणी पार्किंगसाठी सक्तीने पैसे आकारले जात असल्याने, ही सामान्य जनतेची एक प्रकारची उघड लूटच असल्याचा थेट आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.

रेल्वे प्रशासन केवळ जनतेच्या खिशातून पैसे काढण्याचे काम करणार आहे की त्यांच्या सोयी-सुविधांकडेही लक्ष देणार आहे, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

या वाढत्या मनमानी कारभाराकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन प्रवाशांची या लुटीतून मुक्तता करणे अत्यंत आवश्यक आहे.

रेल्वे प्रशासनाने या वाढत्या असंतोषाची गंभीर दखल घेत स्थानक परिसरात अवघ्या काही मिनिटांसाठी वाहने थांबवण्यासाठी मोफत पार्किंगची किंवा स्वतंत्र ड्रॉपिंग झोनची सुविधा त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी रत्नागिरीतील जनतेकडून केली जात आहे.

konkan railway, Passenger Convenience, Pay and Parking, Public Demand, Railway Administration, ratnagiri news, Ratnagiri Railway Station, Traffic Management

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *