रत्नागिरी : विशेष कार्यकारी अधिकारी हे मानाचे पद असून या पदाचा गैरवापर करून स्वतःला मोठे शासकीय अधिकारी समजण्याची चूक करू नका.
जनतेची कामे न करणाऱ्या आणि महत्त्वाच्या बैठकांना दांडी मारणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे अधिकार काढून घेण्यासाठी एक मिनिटही लागणार नाही, असा सज्जड दम जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.
शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी सामंत यांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडताना प्रत्येक पदाधिकाऱ्याला आपल्या कामाचा वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
निवडणुकीच्या काळात पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळावा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध दाखले तसेच कागदपत्रांच्या प्रती मिळवताना होणारा त्रास कमी व्हावा, या प्रमुख उद्देशानेच कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी हे पद दिले जाते.
मात्र, काही नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याबद्दल सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रत्येक विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दरवर्षी नेमकी कोणती कामे केली, याची नोंद ठेवणे आवश्यक आहे. घराघरांत जाऊन नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेणे, त्यांच्या समस्या सोडवणे आणि शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे ही जबाबदारी या पदाधिकाऱ्यांनी पार पाडली पाहिजे.
तसेच या कामांचा वार्षिक अहवाल सादर करणेही आता बंधनकारक असेल, असे सामंत यांनी नमूद केले. केवळ पदाचा गैरवापर करून पक्षाची किंवा पदाची बदनामी करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही.
याशिवाय जुन्या प्रलंबित याद्यांमधील कामे पूर्ण करून नवीन कार्यकर्त्यांनाही संधी आणि न्याय दिला जाईल. विशेष कार्यकारी अधिकारी पदाचा उपयोग केवळ मिरवण्यासाठी न करता पक्षवाढीसोबतच जनसामान्यांच्या कल्याणासाठी झाला पाहिजे, असे आवाहनही सामंत यांनी केले.

Leave a Reply