रत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू आणि उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी खेड येथे सुमारे २० कोटी रुपये खर्चून भव्य ‘उमेद मॉल’ उभारण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उभारण्यात येणारे हे केंद्र जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी एक महत्त्वाचे व्यावसायिक व्यासपीठ ठरेल, अशी माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
दापोली तालुक्यातील देगाव येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या तालुका अभियान व्यवस्थापन कक्षांतर्गत संजीवनी महिला प्रभाग संघ, असोंड यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
महिलांना केवळ आर्थिक मदत देण्यापेक्षा त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारता यावा आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता यावे, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे योगेश कदम यांनी यावेळी सांगितले.
दापोली मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच महिला सक्षमीकरणालाही प्राधान्य दिले जात असून, हे काम आपली कौटुंबिक जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शहरांपासून दुर्गम गावांपर्यंत प्रत्येक ग्रामसंघ सक्षम आणि स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महायुती सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उमेद अभियानाच्या माध्यमातून एक मॉल उभारण्यास मंजुरी दिली आहे.
त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रस्तावित असलेला उमेद मॉल खेड येथे साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील विविध महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना एकाच ठिकाणी विक्रीची संधी मिळणार असून महिलांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र आणि मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल.
देगाव येथे सुरू झालेले संजीवनी महिला प्रभाग संघाचे कार्यालय हे ग्रामीण भागातील पहिले प्रभाग संघ कार्यालय असल्याचे नमूद करत परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी प्रभाकर गोलांबडे, ममता शिंदे आणि नरेश घरटकर यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.
या उद्घाटन सोहळ्याला रोहिणी दळवी, अमित पारदुले, उन्मेष राजे, भगवान घाडगे, दीप्ती निखारगे, प्रकाश कालेकर, प्रदीप जाधव, अनंत करबेले, सुनील दळवी, प्रभाकर गोलांबडे, नरेश घरटकर, ममता शिंदे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, विश्वास खांबे, मोहन भागणे, दिनेश जावळे, फरमान बटे, शांताराम खळे, सुनील चव्हाण, अनुराधा भोसले, रेखा खोपटकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, उमेद अभियानाचे प्रतिनिधी, महिला बचत गटांच्या सदस्या आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

