दापोली : शहरातील नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि जिल्हा विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी पॉक्सो कायद्याबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दापोली न्यायालयाच्या न्यायाधीश वहिदा मकानदार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी ॲड. सुरभी सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना पॉक्सो कायद्याची सविस्तर माहिती दिली. बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी कायद्यातील तरतुदी, बालकांचे अधिकार आणि अन्यायाविरुद्ध तक्रार करण्याची प्रक्रिया याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
न्यायाधीश वहिदा मकानदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कायद्याविषयी जागरूक राहण्याचे, स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजग राहण्याचे आणि कोणत्याही अनुचित प्रसंगाची माहिती विश्वासातील व्यक्ती किंवा संबंधित यंत्रणेला देण्याचे महत्त्व विशद केले. तसेच पत्रकार मनोज पवार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी इकबाल परकार आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार उपस्थित होते. नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, यू. ए. दळवी इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आणि एमईएस वुमेन्स डिग्री कॉलेजच्या विद्यार्थिनींनी या उपक्रमात सहभाग घेतला.
याशिवाय न्यायालयातील वकील, लिपिक, समितीचे सदस्य, विविध शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अल्मास मुकादम यांनी केले, तर कसिमा मुकादम यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि सुरक्षित वातावरणाबाबत संवेदनशीलता वाढविणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

