रत्नागिरी: बंद्यांचे पुनर्वसन, कौशल्य विकास आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांची सीएसआर भागीदार संस्था मुकुल माधव फाउंडेशन यांच्या पुढाकाराने रत्नागिरी जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी ८० दिवसीय प्लंबिंग कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.

जन शिक्षण संस्थान आणि रत्नागिरी जिल्हा कारागृह प्रशासन यांच्या सहकार्याने १५ जूनपासून सुरू झालेल्या या उपक्रमात एकूण २९ बंद्यांनी नोंदणी केली होती.

त्यापैकी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या २५ बंद्यांना २३ ऑक्टोबर रोजी आयोजित विशेष समारंभात ‘स्किल इंडिया’ची प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

बंद्यांना प्लंबिंगचे व्यावहारिक ज्ञान व कौशल्य देऊन, कारागृहातून मुक्त झाल्यानंतर स्वयंरोजगार किंवा नोकरीच्या माध्यमातून त्यांना आर्थिक स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सचिन पाटील, जन शिक्षण संस्थानचे अध्यक्ष तथा गुहागरचे माजी आमदार विनय नातू, निधी सावंत, अमृता शेट्ये आणि प्लंबिंग प्रशिक्षक भिकाजी नाटेकर उपस्थित होते.

तसेच फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने एस. रविंद्रन, नंदकिशोर शिंपी आणि शामराव निंबाळकर यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.

प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या बंद्यांनी या उपक्रमाबद्दल कारागृह प्रशासनाचे आभार मानले असून, या प्रशिक्षणामुळे भविष्यात सन्मानाने व स्वावलंबी जीवन जगण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

कैद्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने विविध संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे.