रत्नागिरी : जिल्ह्यात बालकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध सरकारी योजना आणि मोहिमा केवळ कागदावरच मर्यादित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
प्रशासनाकडून राबवण्यात येत असलेल्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या विशेष अभियानातील ताज्या आकडेवारीने जिल्ह्याची झोप उडवली असून, तब्बल ३९० बालके अति तीव्र कुपोषित (एसएएम) आणि २ हजार ९५२ बालके मध्यम तीव्र कुपोषित (एमएएम) असल्याचे उघड झाले आहे.
कुपोषणाची ही भयावह आकडेवारी प्रशासनाच्या तथाकथित प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर आणि एकूणच आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
कुपोषण ही केवळ एका विभागाची समस्या नसून अपुरा व सकस आहार, गरिबी, गरोदर मातांची हेळसांड आणि स्थानिक आरोग्यसेवांची दुरवस्था यांचा हा एकत्रित परिपाक आहे.
प्रशासनाकडून केवळ तपासण्या आणि आकडेवारी संकलनाचा फार्स सुरू असून प्रत्यक्ष औषधोपचार आणि सकस पोषण आहाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.
मोहिमेअंतर्गत ५ हजार १८५ बालकांचे लसीकरण पूर्ण झाल्याचा आणि २५ हजार ३४ बालकांना लोहयुक्त सिरप वाटप केल्याचा दावा यंत्रणा करत असली, तरी कुपोषित बालकांचा वाढता आकडा या दाव्यांची पोलखोल करणारा आहे.
कोणत्याही मोहिमेचे यश हे केवळ अहवाल आणि सर्वेक्षणावरून नाही, तर बालकांच्या प्रकृतीत होणाऱ्या प्रत्यक्ष सुधारणेवरून ठरते, याचा विसर प्रशासनाला पडलेला दिसतो.
अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आणि बालविकास विभागात योग्य समन्वय साधून प्रत्येक बालकासाठी स्वतंत्र कृती आराखडा राबवणे ही आता काळाची गरज बनली आहे.
जिल्ह्यातील ३९० अति तीव्र कुपोषित बालकांच्या जिवावर बेतलेले हे संकट टाळण्यासाठी आणि २,९५२ मध्यम कुपोषित बालकांची प्रकृती अधिक खालावू नये यासाठी आता युद्धपातळीवर ठोस पावले उचलणे अनिवार्य झाले आहे.
या प्रशासकीय आकडेवारीकडे केवळ शासकीय नोंद म्हणून न बघता कुपोषणाची मूळ कारणे शोधून त्यावर तात्काळ उपाययोजना करणे अपेक्षित आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी, कुपोषित बालकांना नियमित लोहयुक्त सिरप दिले जात असून जनजागृतीसह हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आरोग्य विभागाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
मात्र, आता केवळ आश्वासने आणि वरवरची मलमपट्टी करण्यापेक्षा प्रशासनाने प्रत्यक्ष मैदानात उतरून बालकांचे जीव वाचवण्यासाठी मुळावर घाव घालण्याची वेळ आली आहे.

