रत्नागिरी: कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्हा यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे.

नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून धुळे रेल्वेस्थानकाचा ‘ओरिजिनेटिंग–टर्मिनेटिंग कोचिंग टर्मिनल’ म्हणून विकास करण्याच्या प्रस्तावाची तांत्रिक, परिचालनात्मक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्याची मागणी केली आहे.

२१ ऑक्टोबर २०२६ रोजी पाठविलेल्या या पत्रात राणे यांनी कोकणातील प्रमुख पर्यटनस्थळे आणि धुळे जिल्हा यांना थेट रेल्वेने जोडण्यावर विशेष भर दिला आहे.

या रेल्वे संपर्कामुळे प्रवाशांची वाहतूक सुलभ होण्याबरोबरच पर्यटन, रोजगारनिर्मिती आणि प्रादेशिक व्यापाराला मोठी चालना मिळू शकेल, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

धुळे रेल्वेस्थानकाचा टर्मिनल म्हणून विकास करण्यासाठी यार्ड पुनर्रचना, फलाटांचा विस्तार, पिटलाइन सुविधा, रेल्वेगाड्यांच्या रेकच्या साठवणुकीसाठी व्यवस्था तसेच देखभाल व दुरुस्तीच्या पायाभूत सुविधांचा टप्प्याटप्प्याने विकास करणे आवश्यक असल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासून भविष्यातील संभाव्य प्रवासी संख्या, दीर्घकालीन पायाभूत सुविधांची गरज आणि रेल्वे परिचालनाच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा सविस्तर अभ्यास करण्याची विनंती त्यांनी केली आहे.

कोकण हे निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध असून, धुळ्याशी थेट रेल्वे संपर्क झाल्यास पर्यटकांना प्रवासाचे नवे पर्याय उपलब्ध होतील.

तसेच, धुळे हे मध्य प्रदेश आणि गुजरातकडील प्रवाशांसाठीही महत्त्वाचे केंद्र असल्याने शेजारील राज्यांमधून येणाऱ्या पर्यटकांची संभाव्य मागणीही तपासण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.

रेल्वे बोर्डाने या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करून सकारात्मक कार्यवाही केल्यास कोकण आणि उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक व पर्यटन विकासाच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा