मुंबई : शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या ऑडिओ क्लिपची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आग्रही मागणी केली आहे.

जरांगे पाटील यांनी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी पत्रकार परिषद घेऊन कॉन्फरन्स कॉलद्वारे झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर सादर केली. ही क्लिप १४ ऑक्टोबर २०२४ ची असून ३२ मिनिटांच्या या संवादात वेगवेगळ्या ठिकाणाहून चार जणांनी सहभाग घेतला आहे.

या क्लिपमध्ये १४ मिनिटांनंतर एका संबंधित महिलेचे संभाषण ऐकू येते, ज्यात श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत जरांगे पाटील यांना ५०० कोटी रुपये दिल्याचे म्हटले आहे.

ही अतिशय गंभीर बाब असून याची सखोल चौकशी करून सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणणे गरजेचे असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

या ऑडिओ क्लिपनंतर राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत.

मात्र, तब्बल दोन वर्षांनंतर ही क्लिप जाणीवपूर्वक पुढे आणून खासदार श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हेतुपुरस्सर बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.

विशेष म्हणजे या क्लिपमध्ये भाजप पक्ष कसा वाढवला पाहिजे, याबाबतही सुमारे ३० मिनिटे चर्चा असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मोहन भागवत यांच्या निदर्शनास आणून देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या संपूर्ण प्रकरणाची दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्यासाठी तात्काळ वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.

या क्लिपमधील आवाज नेमका कोणाचा आहे, संवाद साधणारी संबंधित महिला कोण आहे आणि या सर्वांचा बोलवता धनी कोण आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे.

५०० कोटींच्या आरोपाबाबतची स्पष्टता महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावी, यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, असे रामदास कदम यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.