Dapoli : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी दापोली तालुक्यातील केळशी येथील शमीम परकार यांची निवड करण्यात आली आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र लावांधरे यांनी नुकतीच या महत्त्वपूर्ण निवडीची अधिकृत घोषणा केली. शमीम परकार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत आणि तळागाळातील कार्यकर्ते म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याची सुरुवात केळशी या स्वतःच्या गावातून केली होती.

अल्पावधीतच त्यांनी केळशी पंचक्रोशीसह संपूर्ण दापोली तालुक्याच्या विकासकामांसाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पुढाकार घेतला. त्यांच्या याच सातत्यपूर्ण सामाजिक योगदानाची आणि पक्षनिष्ठेची पक्षश्रेष्ठींकडून दखल घेण्यात आली असून, त्यांच्यावर आता थेट प्रदेश स्तरावरील मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

एका निष्ठावंत कार्यकर्त्याला प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्याने स्थानिक पातळीवर मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव हेमंत सालदुरकर यांच्यासह दापोली तालुक्यातील पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शमीम परकार यांचे विशेष अभिनंदन केले असून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.