चिपळूण : शहरातील लोकवस्तीत आरडीसीसी बँकेसमोर शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी तब्बल १२ फूट लांबीचा अजगर आढळल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराट उडाली होती.

मात्र, सर्पमित्र आणि वन विभागाच्या तत्परतेमुळे या अजगराला जीवदान मिळाले असून त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.

शहरात बँकेसमोर महाकाय अजगर असल्याची माहिती मिळताच सर्पमित्र व वकील चिन्मय दीक्षित आणि शिवराज शिर्के यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी मोठ्या शिताफीने या अजगराला सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले व पुढील कार्यवाहीसाठी वन विभागाच्या ताब्यात दिले. यानंतर चिपळूणचे वन परिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांनी या अजगराची पाहणी केली असता तो पूर्णपणे सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली.

रत्नागिरीच्या विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान, रामपूरचे वनरक्षक राहुल गुंठे आणि वाहनचालक नंदकुमार कदम यांच्या उपस्थितीत या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले.

वन्यजीव हे निसर्गाच्या समतोलासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने लोकवस्तीत वन्यप्राणी आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्यांना पकडण्याचा किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

अशा परिस्थितीत नागरिकांनी तत्काळ वन विभागाशी किंवा अधिकृत सर्पमित्रांशी संपर्क साधण्याची विनंतीही प्रशासनाकडून करण्यात आली आहे.