रत्नागिरी: भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून मुंबईत विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग आणि शासकीय विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात तळागाळातील समाजामध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील दहा वाचन प्रेरकांना वाचन दूत म्हणून वाचन प्रेरणा सन्मान २०२६ ने सन्मानित करण्यात आले.मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ भेट आणि दहा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पुरस्कारासाठी कोकण विभागातून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे यांची निवड करण्यात आली. गेली २५ वर्षे त्या झोपडपट्टी, निरीक्षण गृह, बालगृह आणि रत्नागिरी विशेष कारागृहातील बंदीजनांसाठी वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजवत आहेत.

झोपडपट्टीत जात-पात व धर्म विरहित वाचन चळवळ त्यांनी उभी केली असून विशेष कारागृहातील चळवळीतून मुक्ताकांक्षा हा बंदीजनांचा कवितासंग्रह त्यांनी संपादित केला आहे.

जास्त पुस्तके वाचणाऱ्यांना त्या वाचक वीर हा सन्मान देतात. त्यांच्या घरी ३२ प्रकारचा मोठा पुस्तक संग्रह असून तो समाजातील पीडित, अन्यायग्रस्त आणि गरजू लोकांसाठी खुला आहे.

हा सन्मान स्वीकारताना श्रद्धा कळंबटे यांनी भाषा संचालनालय, मराठी विभाग, शासकीय विधी महाविद्यालय आणि राज्याचे भाषा मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.

या पुरस्कारामुळे वाचन चळवळ आणखी जोमाने वाढविण्याचा मानस व्यक्त करत त्यांनी बंदीजनांचा कवितासंग्रह विधी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला भेट दिला.

या कार्यक्रमाला विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मराठी भाषा विभागाचे उपसचिव नामदेव भोसले, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य अस्मिता वैद्य, भाषा संचालक अरुण गीते, तसेच समीक्षक नितीन रिंढे आणि विजय ककडे उपस्थित होते.