जयगड : सागरी महामार्गावरील रत्नागिरी आणि गुहागर तालुक्यांना थेट जोडणाऱ्या जयगड-तवसाळ खाडीवर ७१५ कोटी रुपयांचा अत्याधुनिक केबल-स्टेड पूल वेगाने आकार घेत आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या या २.९ किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, २०२८ पर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

सध्या गुहागरच्या बाजूने पुलाचे काम प्रगतीपथावर असून खाडी पात्रात आणि किनाऱ्यावर पुलाचे खांब उभे करण्यासाठी अत्यंत क्लिष्ट अशी पायलिंग प्रक्रिया प्रगत टप्प्यात आली आहे.

पुलाचा खाडीच्या मधला मुख्य भाग अत्याधुनिक केबल-स्टेड पद्धतीचा असेल, ज्यामुळे खाडीतून जाणाऱ्या मोठ्या जहाजांच्या वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही आणि पुरेशी उंची राखली जाईल.

हा मुख्य पूल आणि त्याला जोडणारे जोड रस्ते चार पदरी असणार आहेत. केबल ज्या मुख्य उंच खांबांवर पेलल्या जाणार आहेत, त्या खांबांचे काँक्रिटीकरण आणि लोखंडी सांगाडे उभारण्याचे काम वेगात सुरू आहे.

जयगड आणि तवसाळ बाजूने पुलाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांसाठीचे मातीकाम व भूसंपादन अंतिम टप्प्यात आले आहे.

किनारपट्टी महामार्ग प्रकल्पांतर्गत सुमारे ३० मीटर रुंदीच्या खाजगी व शासकीय जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून, पर्यावरण आणि कांदळवन क्षेत्रासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्याही मिळाल्या आहेत.

याशिवाय पुलाच्या दोन्ही बाजूंना पर्यटकांसाठी विशेष पादचारी मार्ग ठेवण्यात येणार आहे.

सध्या वाहनधारकांना जयगड ते तवसाळ जाण्यासाठी फेरी बोट सेवेवर अवलंबून राहावे लागते. रात्रीच्या वेळी किंवा हवामान खराब असताना ही सेवा बंद ठेवावी लागत असल्याने प्रवाशांना चिपळूण किंवा लांजा मार्गे सुमारे १०० किलोमीटरचा लांबचा वळसा घालून ३ ते ४ तास प्रवास करावा लागतो.

हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यावर हा महाप्रवास केवळ २.९ किलोमीटरवर येईल. यामुळे अवघ्या ५ ते १० मिनिटांत खाडी पार करता येणार असून, २४ तास अखंड वाहतूक सुरू राहिल्याने प्रवाशांच्या वेळेची आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे.