रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेले ‘शिवसृष्टी’ आणि ‘थ्रीडी मल्टीमीडिया शो’ हे दोन्ही उपक्रम तोट्यात सुरू असल्याच्या वृत्ताचे नगरपरिषदेने अधिकृतरीत्या खंडन केले आहे.

या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रकल्पांकडे केवळ आर्थिक नफ्या-तोट्याच्या दृष्टिकोनातून पाहणे योग्य नसल्याचे स्पष्ट करत, सार्वजनिक निधीचा पारदर्शक व काटकसरीने वापर करण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

शिवसृष्टी प्रकल्पाच्या दैनंदिन कामकाजाचा आणि देखभालीचा खर्च संबंधित ठेकेदारामार्फतच केला जात असल्याने नगरपरिषदेवर कोणताही मोठा स्वतंत्र आर्थिक भार पडत नाही.

त्यामुळे हा प्रकल्प तोट्यात चालत असल्याचे चित्र वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या प्रकल्पाच्या संचालनासाठी काही प्रमाणात वीज खर्च होत असला तरी, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

अशा ऐतिहासिक वारशाचे जतन करताना प्रत्येक बाबीचे मूल्यमापन केवळ आर्थिक फायद्यावर करता येत नाही. तरीही, खर्चात बचत करण्यासाठी नगरपरिषदेकडून सध्या सौरऊर्जेचा पर्याय तपासला जात असून त्यातून भविष्यातील वीजखर्च कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दुसरीकडे, छत्रपती शिवाजी महाराज, कोकणातील भारतरत्ने आणि थोर व्यक्तींच्या वारशाची आधुनिक तंत्रज्ञानाने माहिती देणारा थ्रीडी मल्टीमीडिया शो हादेखील वारसा संवर्धन व जनजागृतीचा महत्त्वाचा उपक्रम आहे.

या प्रकल्पासाठी झालेल्या मूळ खर्च व्यतिरिक्त आजवर कोणताही अनावश्यक खर्च करण्यात आलेला नाही. याच्या भविष्यातील देखभालीसाठी ठेकेदाराकडून आलेले दरपत्रक अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने सध्या त्यांच्यासोबत वाटाघाटी सुरू आहेत.

हा खर्च नगरपरिषदेच्या आर्थिक क्षमतेच्या मर्यादेत आणि वाजवी राहील याची दक्षता घेतली जात आहे. शहराच्या पर्यटन आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पांचे प्रभावी संचालन करणे ही नगरपरिषदेची जबाबदारी असून कोणताही नियमबाह्य किंवा अवाजवी खर्च केला जाणार नसल्याची ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे.