दापोली : तालुक्यातील जालगाव पांगारवाडी येथे जन्मदात्या मुलानेच आपल्या आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवार, २३ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
सुनील आग्रे (वय ४०) असे या हल्लेखोर मुलाचे नाव असून, त्याने आपले वडील मधुकर आग्रे यांच्या डोक्यावर व हातावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. तसेच, त्याने आपल्या आईच्या डोक्यावर काचेची बाटली फोडून तिलाही गंभीर जखमी केले.
ही खळबळजनक घटना मधुकर आग्रे यांच्या राहत्या घरीच घडली. या अमानुष हल्ल्यात मधुकर आग्रे आणि संबंधित पीडित महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर दुखापती झाल्या आहेत. भरदिवसा घरातच हा रक्तपात झाल्याने जालगाव परिसरात काही काळ तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर जखमी दांपत्याला तातडीने दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोघांच्याही जखमा गंभीर स्वरूपाच्या असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत संशयित आरोपी सुनील आग्रे याला ताब्यात घेतले आहे. या प्राणघातक हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, हा धक्कादायक प्रकार कौटुंबिक वादातून घडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
दापोली पोलिसांकडून हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सखोल तपासानंतरच घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल.

