रत्नागिरी : कायदा व सुव्यवस्था, सायबर गुन्हे, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, महिला व बालकांची सुरक्षा आणि वाहतूक सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये सातत्याने जागरुकता निर्माण करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ‘मिशन प्रबोधन’ हा एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

यापूर्वी पोलिसांच्या विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून जवळपास पंधरा लाख नागरिकांपर्यंत संदेश पोहोचविण्यात आला होता.

आता हा प्रवाह पोलीस ठाण्यापुरता मर्यादित न ठेवता गावागावातील ग्रामसभा, शाळा-महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे आणि शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरापर्यंत थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी हा नागरिकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे.

या अंतर्गत जिल्ह्यातील विविध गावांमध्ये ग्रामसभांच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी आणि स्थानिक पातळीवरील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांची माहिती जाणून घेत त्यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

रत्नागिरी पोलीस दलामार्फत यापूर्वी राबविण्यात येत असलेल्या विविध जनजागृती उपक्रमांना आता ‘मिशन प्रबोधन’च्या माध्यमातून एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

यामध्ये आपत्कालीन मदतीसाठी डायल ११२, ऑनलाइन फसवणुकीपासून संरक्षणासाठी सायबर जागृती, युवकांमध्ये अमली पदार्थांविरोधात जनजागृती करणारे मिशन रायझिंग फ्लॉवर्स आणि कारवाईसोबतच प्रतिबंधात्मक जनजागृती करणारे मिशन फिनिक्स यांचा समावेश आहे.

तसेच गुन्हे तपासातील प्रगतीबाबत नागरिकांशी संवाद साधणारे मिशन प्रगती, पोलिसांच्या प्रतिसादाबाबत अभिप्राय घेणारे मिशन परिपूर्ती, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मिशन जीवन आणि नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद देणारे मिशन प्रतिसाद हे उपक्रमही या मोहिमेचा महत्त्वाचा भाग आहेत.

याशिवाय गतिमान पोलीस सेवेसाठी मिशन रॅपिड आणि वाहतूक नियमांच्या पालनासाठी मिशन टेप फॉर सेफ याद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षितता व कायद्याचे ज्ञान निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

‘मिशन प्रबोधन’चे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जाणार आहे.

कायदेशीर तरतुदी, सायबर सुरक्षेचे नियम आणि फसवणुकीपासून बचावाचे उपाय नागरिकांना सहज समजावेत यासाठी एआय आधारित तंत्रज्ञान, डिजिटल माध्यमे, व्हिडिओ, अॅनिमेशन आणि माहितीपटांचा वापर करण्यात येणार आहे.

तंत्रज्ञानाधारित पोलीसिंगला प्राधान्य देत रत्नागिरी पोलिसांनी यापूर्वीच एआय-पॉवर्ड रेड्स अॅप, जीआयएस-बेस्ड बंदोबस्त अॅप आणि रत्नसेतू एआय असिस्टंट यांचा प्रभावी वापर सुरू केला आहे.

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधीक्षक वी. वी. महामुनी यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेद्वारे स्थानिक घटकांच्या माध्यमातून पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ केला जाणार असून, जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातील नागरिकापर्यंत पोहोचण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.