दापोली : जानाई देवी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, मौजे दापोली यांच्या वतीने जानाई देवी मंदिर येथे गावाच्या विकासासाठी तसेच सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या ३३ मान्यवरांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
गावाच्या विकासामध्ये विविध स्तरांवर योगदान देणाऱ्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील आजी-माजी सरपंच, ग्रामविकास मंडळ अध्यक्ष, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच गावातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वपूर्ण सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस, आशा सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आल्याने उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
सामाजिक बांधिलकी जपत गावासाठी विविध स्तरांवर काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याचा उपक्रम जानाई देवी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने राबविण्यात आला.
या सत्कारामुळे आजी-माजी पदाधिकारी तसेच विविध शासकीय व सामाजिक सेवा देणाऱ्या कर्मचारीवर्गाचा, शेती, ज्येष्ठ नागरिक, साक्षरता, उद्योजक, कला, क्रीडा, आरोग्य, व्यसनमुक्ती आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा उत्साह वाढला असून, गावाच्या विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास गावातील नागरिक, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुधीर कालेकर, माजी अध्यक्ष प्रकाश म्हसकर, वसंत म्हसकर, माजी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल भुवड, सरपंच सूर्यकांत म्हसकर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुरेश गावडे, जानाई देवी कला क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत म्हसकर, माजी सरपंच अंजली पवार, माजी उपसरपंच संतोष बुरटे, माजी अध्यक्ष अजय पवार, पोलीस पाटील कुलदीप पवार, तंटामुक्ती समिती अध्यक्ष हेमंत भुवड, महिला मंडळाच्या अध्यक्षा संजना भुवड, मारुती गावडे, केरू भुवड, सरस्वती म्हसकर, आरती म्हसकर, जानाई देवी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र पवार, उपाध्यक्ष नरेश चरकरे आदी उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश राऊत यांनी केले.

