रत्नागिरी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने खेडशी येथील बाळसत्याधारी महाराज व्यसनमुक्ती सेवा केंद्र येथे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘लोकसंवाद २०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सध्याच्या डिजिटल युगात स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यासोबत सायबर गुन्हेगारीचे मोठे संकटही उभे राहिले आहे. त्यामुळे स्मार्टफोन वापरताना नागरिकांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अत्यंत सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांनी केले.

यावेळी बाळ सत्याधारी, मिरजोळेचे उपसरपंच राहुल पवार, माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी सम्राट पाटील, खेडशीचे माजी सरपंच भिकाजी गावडे, उद्योजक अरविंद माने, मुख्याध्यापक सुभाष पाटील आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते उपस्थित होते.

प्रशांत सातपुते यांनी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिल्यानंतर स्मिता सुतार यांनी सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली.

सायबर गुन्हेगारांच्या विविध क्लृप्त्या उलगडताना स्मिता सुतार यांनी स्पष्ट केले की, अनोळखी क्रमांकावरून येणारे मेसेज, संशयास्पद लिंक्स किंवा व्हॉट्सॲपवर येणाऱ्या कोणत्याही अनधिकृत गोष्टींवर क्लिक करू नये.

एका क्लिकमुळे संपूर्ण मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगारांकडे जाऊ शकतो आणि बँक खात्यांची माहिती, वैयक्तिक छायाचित्रे व ओळखपत्रे हाती लागल्यास त्याचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते.

डिजिटल अरेस्ट, बनावट पोलीस अधिकारी बनून धमकावणे, शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली होणारी फसवणूक, गॅस बिल भरण्याचे खोटे मेसेज आणि इन्स्टंट लोन ॲप्सच्या माध्यमातून होणारे ब्लॅकमेलिंग याविषयी रत्नागिरी परिसरातील प्रत्यक्ष उदाहरणे देऊन त्यांनी नागरिकांना सावध केले.

अशा कोणत्याही धमक्यांना किंवा आमिषांना बळी न पडता कुटुंबीयांशी संवाद साधण्याचा सल्ला त्यांनी दिला. कोणत्याही प्रकारची सायबर किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास नागरिकांनी वेळ न दवडता तत्काळ शासनाच्या १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर किंवा थेट सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, जेणेकरून खात्यातून गेलेली रक्कम तत्काळ गोठवून वाचवता येईल.

तंत्रज्ञानाचा वापर करताना सजगता आणि सुरक्षितता बाळगणे हीच सायबर गुन्ह्यांपासून बचावाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.