वाशी : राज्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आणि आंबा निर्यात प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी नुकतीच रत्नागिरी जिल्ह्याच्या पदाधिकारी मंडळाने वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या आंबा निर्यात केंद्राला सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान त्यांनी निर्यातीच्या विविध टप्प्यांची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

या दौऱ्यामध्ये कृषी सभापती महेश नाटेकर, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, राजापूर पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, संगमेश्वर पंचायत समिती सभापती शर्वरी वेल्हे, चिपळूण पंचायत समिती सभापती सूर्यकांत खेतले, गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, दापोली पंचायत समिती सभापती उन्मेश राजे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद निवळकर, कृषी विभागाचे अधिकारी अभिजीत गडदे आणि जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांनी आंबा निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेची, जसे की आंब्याची प्रतवारी, स्वच्छता, वेष्टन आणि साठवणूक यांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, परदेशात आंबा पाठवण्यापूर्वी त्यावर केली जाणारी व्हेपर हीट ट्रीटमेंट आणि इरॅडिएशन प्रक्रियेची तांत्रिक माहिती निर्यात केंद्राच्या तज्ज्ञांकडून जाणून घेतली.

या भेटीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी निर्यात केंद्राचे व्यवस्थापक अनिमेश पाटील आणि त्यांच्या टीमसोबत बैठक घेतली. यामध्ये निर्यातीसाठी आवश्यक असलेले निकष, युरोप आणि आखाती देशांमधील आंब्याची मागणी, आणि निर्यातीदरम्यान येणाऱ्या अडचणी यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

आपल्या जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा माल थेट परदेशात कसा पाठवता येईल आणि त्यांना जास्तीत जास्त आर्थिक फायदा कसा मिळवून देता येईल, यावर या बैठकीत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

निर्यातक्षम आंबा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. या भेटीनंतर बोलताना कृषी सभापती महेश नाटेकर यांनी सांगितले की, वाशी येथील आंबा निर्यात केंद्राची कार्यप्रणाली अत्यंत अद्ययावत आहे.

येथून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मँगोनेट रजिस्ट्रेशन करण्याकरता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त उद्युक्त केले जाणार आहे.

निर्यातक्षम उत्पादनावर भर दिल्यास आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच मोठी वाढ होईल. या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील आंबा बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी हंगामात निर्यातीचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत.