रत्नागिरी: गणेशोत्सवासाठी मुंबई व पुण्यातून रेल्वेने रत्नागिरीत येणाऱ्या जिल्हावासियांना रेल्वे स्थानकावरून पुढे जाण्यासाठी काही रिक्षाचालकांकडून भरमसाठ भाडे आकारले जात असून ही लूट अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिला आहे.
आगामी १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात होणार्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा शांतता समितीची बैठक पार पडली, ज्यामध्ये जिंदल यांनी उप प्रादेशिक परिवहन विभागाने या प्रकारावर तातडीने नियंत्रण ठेवावे आणि जास्त भाडे आकारणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश दिले.
शांतता समितीचे अध्यक्ष मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक पोलीस अधीक्षक आकांशा यादव, मुख्याधिकारी वैभव गारवे प्रत्यक्ष उपस्थित होते, तर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
उत्सवादरम्यान शहरात रस्त्यांवर मोकाट गुरांचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी, शहरातील फुटपाथ मोकळे करावेत आणि पकडलेल्या जनावरांच्या संवर्धनाबाबत योग्य नियोजन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.
तसेच जड व अवजड वाहनांच्या परवानगीबाबत आणि रस्त्यावर नो पार्किंग किंवा इतर महत्त्वाचे मार्गदर्शक फलक नागरिकांना स्पष्ट दिसतील अशा ठिकाणी लावण्याबाबत सांगण्यात आले.
गणेशोत्सवात महावितरणने वीजपुरवठा खंडित होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यावी आणि गणपती विसर्जन स्थळांवर पुरेशी प्रकाशयोजना, सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक आणि आपत्कालीन स्थितीत बोटींची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, विसर्जन मार्ग आधीच निश्चित करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.
दरम्यान, रामनाका ते विठ्ठल मंदिर या रस्त्यावर फळविक्रेत्यांनी गाड्या लावून केलेल्या अतिक्रमणमुळे तसेच दुचाकींच्या बेवारस पार्किंगमुळे पादचाऱ्यांना व ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून हा त्रास टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करून रस्ते मोकळे करण्याचे आदेश देण्यात आले.
शांतता समितीच्या सदस्यांशी अधिक चांगला ताळमेळ राहावा यासाठी त्यांना अधिकृत ओळखपत्रे देण्यात यावीत आणि त्यांच्यासाठी एक विशेष व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात यावा, जेणेकरून आपत्कालीन व आवश्यक माहितीची देवाणघेवाण जलद गतीने होऊ शकेल, अशा सूचनाही जिंदल यांनी बैठकीत केल्या, ज्यामध्ये विविध विभागांचे अधिकारी आणि जिल्हा शांतता समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

