दापोली : तालुक्यातील पन्हाळेकाजी येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप जाधव यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. गावातील तंटे गावातच मिटावेत, न्यायप्रक्रियेतील वेळ आणि पैसा वाचावा तसेच ग्रामस्थांमध्ये सामंजस्याचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या तंटामुक्त समितीला ग्रामीण भागात मोठे महत्त्व असते.
नुकत्याच पार पडलेल्या पन्हाळेकाजी ग्रामसभेत गावातील अनेक महत्त्वाच्या विकासकामांवर आणि प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
याच ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या नव्या कार्यकारिणीबाबतही विचारविनिमय झाला आणि अध्यक्षपदासाठी प्रदीप जाधव यांच्या नावावर ग्रामस्थांनी शिक्कामोर्तब केले.
गावातील सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रलंबित तसेच नव्याने उद्भवणारे तंटे सामोपचाराने सोडवण्यासाठी जाधव यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीनंतर परिसरातील नागरिक, स्थानिक पातळीवरील नेते आणि ग्रामस्थांकडून प्रदीप जाधव यांचे कौतुक केले जात असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

