दापोली : श्रावणातील पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांना आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देत दापोली शिवसेना महिला आघाडीच्या वतीने भव्य मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सलग आठ तास चाललेल्या या चुरशीच्या स्पर्धेत दापोली तालुक्यातील तब्बल २० महिला समूहांनी सहभाग नोंदवला.

यात उत्कृष्ट सादरीकरण करत ‘मैत्री ग्रुप’ने प्रथम क्रमांक पटकावून ३५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह मिळवले.

तर ‘झिम्मा क्वीन’ समूहाने द्वितीय क्रमांक मिळवून २५ हजार रुपये आणि ‘काळकाई महिला ग्रुप’ने तृतीय क्रमांक मिळवून १५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह प्राप्त केले.

ग्रामीण लोकजीवन आणि लोककलेच्या अभ्यासक वर्षा भट (दिवे आगर) तसेच अर्चना जोशी (रत्नागिरी) यांनी स्पर्धेचे काटेकोर परीक्षण केले.

या सांस्कृतिक महोत्सवात सामाजिक कार्यकर्त्या श्रेया कदम यांनी विशेष लक्ष वेधून घेतले. त्यांनी स्वतः सहभागी महिलांसोबत मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांचा ठेका धरत महिलांचा उत्साह द्विगुणीत केला.

यावेळी बोलताना त्यांनी दापोलीच्या नाट्यगृहासाठी शासनाने मंजूर केलेल्या १५ कोटी रुपयांच्या निधीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री योगेश कदम यांचे आभार मानले.

पुढील वर्षी ही भव्य मंगळागौर स्पर्धा दापोलीतील हक्काच्या वातानुकूलित नाट्यगृहात आयोजित केली जाईल, असा ठाम विश्वास श्रेया कदम यांनी व्यक्त केला.

तसेच आगामी काळात महिलांसाठी आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी आणखी मोठी व्यासपीठे उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.

या कार्यक्रमाला मंत्री योगेश कदम यांनीही उपस्थिती दर्शवून जुनी लोकपरंपरा जपत एकत्र आलेल्या महिलांचे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याला नगराध्यक्षा कृपा घाग, महिला आघाडी प्रमुख दीप्ती निखार्गे, माजी जि.प. अध्यक्षा रोहिणी दळवी, माजी समाजकल्याण सभापती चारुता कामतेकर, पं.स. सदस्य ममता शिंदे, रसिका पेठकर, कीर्ती परांजपे, रिया सावंत यांच्यासह शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सखी शरद यांनी केले. ही स्पर्धा केवळ एक स्पर्धा नसून महिलांच्या कलागुणांना वाव देणारी आणि महिला शक्तीला एकत्र आणणारी चळवळ ठरली.

हेही वाचा