दापोली : सायकलिंग क्लबच्या शरद भुवड यांनी ३ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत मनाली ते लेह लडाख ही अत्यंत खडतर सायकल मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
विशेष म्हणजे ही मोहीम पूर्णपणे ‘सेल्फ सपोर्टेड’ होती, ज्यामध्ये सहभागी सायकलस्वारांनी प्रवासातील आपले सर्व सामान स्वतःच्या सायकलवरच वाहून नेले.
या धाडसी मोहिमेत शरद भुवड यांच्यासह आदित्य दास, सुप्रिय फले, अनिल गडगे आणि जनार्दन वैद्यनाथन या पाच जणांचा सहभाग होता.
गाडीच्या बंद काचेतून निसर्ग पाहण्यापेक्षा सायकलच्या हँडलवर घट्ट पकड ठेवून आणि अंगावर थंड वाऱ्याचे झोत झेलत हिमालयाची चढण पार करणे हा एक वेगळाच थरार असतो.
मनाली, लाहौल आणि झांस्कर खोऱ्यातील दुर्गम रस्ते पार करणे हे आज जगभरातील सायकलस्वारांसाठी एक मोठे स्वप्न बनले असून या टीमने हे स्वप्न वास्तवात उतरवले आहे.

या मोहिमेविषयी अधिक माहिती देताना शरद भुवड यांनी सांगितले की, सायकलच्या प्रत्येक पेडलसोबत बदलणारे निसर्गाचे रुप आणि वाढलेली श्वासाची गती हा अनुभव शब्दांत मांडता न येण्याजोगा आहे.
मनालीच्या हिरव्यागार दऱ्यांमधून सुरू झालेला हा ६०० किलोमीटरहून अधिक अंतराचा प्रवास कोठी, मढी, रोहतांग पास, कोकसर, त्रिलोकीनाथ, कीलाँग, शिंकुला पास, झंस्कार सुम्दो, गोम्बो रांझन, पुराने, फुगताल, पदुम, कर्शा मॉनेस्ट्री, लेह लडाख आणि खार्दुंगला या मार्गे पार पडला. या प्रवासात निसर्गाच्या विविध छटांचा अनुभव या सायकलस्वारांना घेता आला.
या संपूर्ण मोहिमेतील सर्वात थरारक आणि आव्हानात्मक टप्पा म्हणजे लेहवरून सुरू झालेली खार्दुंगला येथील १७,९८२ फूट उंचीची चढण होती. ८४ किलोमीटरच्या या खडतर आणि उंचावरील रस्त्यावर सायकल चालवताना शारीरिक क्षमतेसोबतच कमालीची जिद्द लागते.
जेव्हा सायकल जगातील सर्वोच्च मोटरेबल रस्त्यांपैकी एक असलेल्या खार्दुंगला टॉपवर उभी राहिली, तेव्हा तो क्षण आयुष्यातील सर्वात सुवर्णक्षण ठरला, अशी भावना या सायकलस्वारांनी व्यक्त केली. सायकलवरून केलेला हा प्रवास सोपा नव्हता; यात हवामान सतत परीक्षा घेते आणि थकवा जाणवतो.
परंतु इंजिनाशिवाय केवळ स्वतःच्या ताकदीवर हिमालयाची शिखरे पार करताना स्वतःमधील एका नवीन आणि धाडसी व्यक्तीचा शोध लागतो. ही खडतर मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल शरद भुवड, आदित्य दास, सुप्रिय फले, अनिल गडगे आणि जनार्दन वैद्यनाथन या संपूर्ण टीमचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

