दापोली : येथे चंदूभाई मेहता यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त चंदूभाई मेहता समाजसेवा प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने दापोली तालुक्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण सोहळा रविवारी, १६ ऑगस्ट २०२६ रोजी शिंदे गुरुजी सभागृह, नवभारत छात्रालय येथे उत्साहात पार पडला.

विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला, विचारक्षमतेला व सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, तसेच विविध सामाजिक व समकालीन विषयांवर विद्यार्थ्यांनी चिंतन करावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.

गट क्रमांक एकमध्ये दापोली तालुक्यातील ३० शाळांमधून ५२६ निबंध, तर गट क्रमांक दोनमध्ये ११ महाविद्यालयांमधून २६२ असे एकूण ७८८ निबंध प्राप्त झाले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे उपस्थित होते. यावेळी चंदूभाई मेहता समाजसेवा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त सुधीर देसाई, कार्यक्रम संयोजक कुणाल मेहता, परीक्षकांच्या वतीने अमोल नलावडे आणि सई प्रभू, तसेच दापोलीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रतिष्ठानचे सदस्य, विविध शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात चंदूभाई मेहता व साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून करण्यात आली. चंदूभाई मेहता यांच्या कार्याची व जीवनप्रवासाची माहिती कैलास गांधी यांनी उपस्थितांना करून दिली.

स्पर्धेच्या गट क्रमांक एकमध्ये संजीव शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलमधील उत्कर्ष तोडणकर याने प्रथम क्रमांक पटकावला. माटवण येथील आर. जी. पवार माध्यमिक शाळेच्या श्रेयस मुरचवडे याने द्वितीय, तर दापोलीच्या ए. जी. हायस्कूलची पूर्वा मांढरे आणि तळसुरे येथील न्यू इंग्लिश स्कूलची वेदांती शिंदे यांनी तृतीय क्रमांक विभागून मिळवला.

गट क्रमांक दोनमध्ये दापोलीच्या ए. जी. हायस्कूलमधील वैष्णवी लखमदे हिने प्रथम क्रमांक मिळविला. वराडकर महाविद्यालयातील दाभोळकर याने द्वितीय क्रमांक पटकावला, तर वराडकर महाविद्यालयातील साक्षी जाधव आणि नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील शिमाज सौतिरकर यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.

प्रथम क्रमांकास २,५०० रुपये, द्वितीय क्रमांकास १,५०० रुपये आणि तृतीय क्रमांकास १,००० रुपये, तसेच आकर्षक चषक, पुस्तक व प्रशस्तिपत्रक देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून उत्तेजनार्थ पारितोषिकांची संख्या दोनवरून सात करण्यात आली.

या स्पर्धेचे परीक्षण शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व मराठी भाषेचे तज्ज्ञ असणाऱ्या शारदा गांगुर्डे, अमोल नलावडे, गौतमी पाटील, सई प्रभू, लीना केदारे, सीमा देसाई, रोहिणी पवार आणि देशपांडे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे अतुल पेठे यांनी खेड्यातील मुले शहरातील मुलांपेक्षा मागे नसून, आपल्या ताकदीच्या जोरावर ती पुढे जाऊ शकतात असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.

तसेच कला, लेखन, अभिनय आणि सर्जनशीलतेचा भविष्यात कसा उपयोग होऊ शकतो यावरही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मराठे यांनी केले. कुणाल मेहता यांनी स्पर्धेची माहिती दिली, अमोल नलावडे यांनी परीक्षण प्रक्रियेबाबत मनोगत व्यक्त केले आणि सचिन मेहता यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली.

सुधीर देसाई यांनी अध्यक्षीय भाषण केले आणि तेजस मेहता यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. विनय मेहता यांनी आभार मानले. या यशस्वी आयोजनासाठी सुधीर देसाई, सचिन मेहता, विनय मेहता, कुणाल मेहता, तेजस मेहता, दशानेमा गुजर युवक संस्थेचे सर्व सदस्य, जयवंतशेठ जालगावकर आणि संदिप दिवेकर यांनी विशेष मेहनत घेतली.