चिपळूण: ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या पत्रकारांच्या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय ‘नानासाहेब जोशी स्मृती पुरस्कार’ चिपळूण येथील पत्रकार मकरंद भागवत यांना जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा २० ऑगस्ट रोजी मुंबईतील ग्रॅण्ट रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या वतीने दरवर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित केले जाते.
दैनिक सागरचे संस्थापक संपादक निशिकांत तथा नानासाहेब जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या पुरस्काराचे आयोजन केले जाते. या पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष असून, पत्रकारितेतील सडेतोड आणि अभ्यासपूर्ण योगदानाची दखल घेऊन मकरंद भागवत यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
मकरंद भागवत यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात दैनिक सागरमधून केली असून त्यांनी मागील तीन दशकांत विविध दैनिकांमध्ये उपसंपादक पदावर कार्य केले आहे.
तसेच त्यांनी स्वतःच्या साप्ताहिक आणि मासिकाचे संपादनही यशस्वीपणे सांभाळले आहे.
सध्या ते डिजिटल मीडिया आणि समाज माध्यमांवर राजकीय तसेच सामाजिक घडामोडींवर सातत्याने विश्लेषणात्मक लेखन करत आहेत.
या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर ऑल जर्नालिस्टचे संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल, प्रदेशाध्यक्ष विठ्ठल मोघे, केंद्रीय सचिव अतुल होनकळसे, प्रमुख विश्वस्त गणेश कोळी यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतून मकरंद भागवत यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
२० ऑगस्ट रोजी होणाऱ्या या सोहळ्यात भागवत यांच्यासह राज्यातील अन्य पत्रकारांचाही गौरव केला जाणार आहे. तीन दशकांपूर्वी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारितेची सुरुवात केली, त्यांच्याच नावाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल समाधान आणि आनंद वाटत असल्याची भावना मकरंद भागवत यांनी व्यक्त केली आहे.

