दापोली : तालुक्यातील गव्हे येथे अमृते चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिवंगत अरविंद अमृते यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत आरोग्य, नेत्र, दंत तपासणी आणि औषध वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या शिबिराचा परिसरातील एकूण १०८ शेतकरी आणि ग्रामस्थांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसाद करमरकर यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी सुयोग भागवत उपस्थित होते. याप्रसंगी मंदार क्षीरसागर आणि पवन सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या अध्यक्षीय भाषणात सुयोग भागवत यांनी शेतकरी व ग्रामस्थांना निरोगी आयुष्यासाठी चांगला आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय काळजी घेण्याचे महत्त्व पटवून दिले.
तसेच सध्याच्या काळात प्लास्टिकच्या अतिवापराचे शरीरावर होणारे घातक परिणाम लक्षात घेता दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अमृते चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा शैला अमृते यांनी ट्रस्टच्या विविध सामाजिक व समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देत आगामी काळातही गावात व परिसरात असेच लोककल्याणकारी उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला.

कार्यक्रमादरम्यान माजी उपसरपंच महेश मुंडेकर यांनी दिवंगत अरविंद अमृते यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांनी गावाच्या विकासासाठी केलेल्या कार्याचे स्मरण केले.
या तपासणी शिबिरामध्ये ४ नवीन मधुमेह रुग्ण, ६ नवीन उच्च रक्तदाब रुग्ण आणि २ मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांची नोंद झाली असून त्यांना पुढील योग्य उपचाराचा सल्ला देण्यात आला आहे.

या शिबिराला अमृते चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव गोमती अमृते, खजिनदार आशिका अमृते-चाचड, उपसरपंच बाळकृष्ण जोशी, गावचे अध्यक्ष सुधाकर मोरे, पोलीस पाटील संदीप लिंगावळे, माजी सरपंच अशोक गुरव, अरुण पालटे, सुनंदन भावे, ब्राम्हणवाडी अध्यक्ष सदानंद आंबेकर, सचिन पवार, पत्रकार अजित सुर्वे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरात लायन्स क्लब दापोलीच्या वतीने उपस्थित सर्वांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे आभार आशिष अमृते यांनी मानले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण जोशी यांनी केले.

