दापोली: दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका प्रीती शिर्के आणि कुडावळे येथील महेश कदम यांची दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण कार्यकारी समितीच्या सदस्यपदी आमदार नियुक्त सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल दापोली शहरासह खेर्डी गण आणि तालुक्यातील विविध स्तरांतून दोघांचेही अभिनंदन केले जात आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, रुग्णालयातील विविध समस्या जाणून घेऊन रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे यात रुग्ण कल्याण कार्यकारी समिती महत्त्वाची भूमिका बजावते.
या समितीच्या माध्यमातून रुग्णालयातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी व लोकाभिमुख करण्यासाठी निरंतर प्रयत्न केले जातात.
या महत्त्वपूर्ण समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याने प्रीती शिर्के आणि महेश कदम यांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याला आणखी एक महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे.
दापोली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, त्यांच्या अडचणी प्रशासनाच्या निदर्शनास आणून त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत, यासाठी या दोघांच्या सहभागाला विशेष महत्त्व असणार आहे.
तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न, रुग्णालयातील पायाभूत सुविधा तसेच सर्वसामान्य रुग्णांना मिळणाऱ्या सेवांमध्ये आवश्यक सुधारणा घडवून आणण्यासाठी समितीच्या माध्यमातून सकारात्मक योगदान देण्याची मोठी संधी त्यांना मिळाली आहे.
या निवडीचे विविध क्षेत्रातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी स्वागत केले असून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या समितीवर नियुक्त झालेल्या दोन्ही सदस्यांनी दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे आभार मानले आहेत.

