दापोली : शहरातील रसिक रंजन नाट्यगृहात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक मंगळागौर संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, या मुख्य उद्देशाने ही स्पर्धा भरवण्यात येत आहे.
राज्यमंत्री योगेश कदम, त्यांच्या पत्नी श्रेया कदम आणि ज्योती कदम यांच्या सौजन्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळागौर हा महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा तसेच महिलांच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीचा एक महत्त्वाचा भाग असून, या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना आपले पारंपरिक खेळ, गीते आणि नृत्य सादर करण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
या स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या संघांना रोख रक्कम आणि आकर्षक सन्मानचिन्हे देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघालाही प्रोत्साहनपर सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला व संघांसाठी १८ ऑगस्टपर्यंत नोंदणीची मुदत देण्यात आली आहे. या आयोजनामुळे सध्या दापोली परिसरातील महिला वर्गात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पारंपरिक मंगळागौर खेळ व सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या या स्पर्धेत दापोली तालुक्यातील महिला मंडळे, बचतगट आणि महिलांच्या विविध समूहांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच नागरिकांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

