दापोली : तालुक्यातील साखळोली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी संपन्न झाला.

२०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय आणि दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावणारी विद्यार्थिनी आद्या विनोद गोरीवले हिच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.

ध्वजारोहणानंतर शुभ्रा घडवले हिने उपस्थितांना नशामुक्ती व व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा दिली. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात विविध सत्कार समारंभ पार पडले.

बीडीएस, मंथन यांसारख्या बाह्य परीक्षांमध्ये तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन माता गटांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करण्यासाठी मुंबईहून आलेल्या नेचर नेस्टचे उमेश प्रभाळे, मनिषा प्रभाळे आणि मानस प्रभाळे यांनी आद्या गोरीवले, माही गौरत, मैत्री आडवीलकर, सिद्धांत तांबे आणि सिया देवघरकर या यशस्वी विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.

तसेच शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि साखळोली लुंबिनी बौद्धविहार यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक समीर ठसाळ यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यासोबतच शाळेला सहकार्य करणाऱ्या विविध व्यक्तींचाही गौरव करण्यात आला. यानंतर लुंबिनी बौद्धविहार येथे आयोजित बालसभेत तब्बल ४२ विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत मनोगते व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही बालसभा विशेष आकर्षण ठरली. सोहळ्याची सांगता विद्यार्थ्यांना जिलेबी, लाडू, चॉकलेट व बिस्किटे वाटून करण्यात आली.

शाळेच्या विकासासाठी गावकऱ्यांकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल शिक्षकवर्ग व शाळा व्यवस्थापन समितीने समाधान व्यक्त केले. डिजिटल शाळा, परसबाग, बगीचा आणि भौतिक सुविधा ग्रामस्थ व देणगीदारांमुळे अधिक सक्षम होत असल्याचे शिक्षणतज्ज्ञ मनोज जाधव यांनी सांगितले.

यावेळी मावळत्या शाळा व्यवस्थापन समितीचे आभार मानण्यात आले आणि नूतन समितीचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक समीर ठसाळ यांनी केले. या सोहळ्यास सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश भुवड, विस्तार अधिकारी पंढरीनाथ देवघरकर, सरपंच दीक्षा तांबे, उपसरपंच दिनेश जाधव, पोलीस पाटील सुनील गौरत, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैभवी गोरीवले, उपाध्यक्षा सुप्रिया लोवरे यांच्यासह ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.