दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा शशांक घाग यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात नगरपंचायतीचे अभियंता, लेखापाल, लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि सफाई कर्मचारी अशा सर्वच स्तरांतील कर्मचाऱ्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या विशेष कार्यक्रमावेळी दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महेश धुमाळ, नगराध्यक्षा कृपा घाग, नगरसेवक रविंद्र क्षीरसागर, नगरसेविका साधना बोत्रे, प्रीती शिर्के, जया साळवी, शिवानी खानविलकर, तसेच रिया सावंत, आश्विन लांजेकर, मंदार केळकर आणि फिरोज गिलगिले आदी उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.