नवी दिल्ली : कोकणातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरविणारे शिक्षणतज्ज्ञ संदीप राजपुरे यांना पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यापीठातर्फे प्रतिष्ठेची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.

दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य सन्मान सोहळ्यात त्यांना मानपत्र, पदक आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही महानगरांप्रमाणे दर्जेदार, आधुनिक आणि रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे, या उदात्त ध्येयाने संदीप राजपुरे यांनी उभारलेले शैक्षणिक विश्व आज कोकणातील हजारो विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरले आहे.

शालेय शिक्षणापासून ते उच्च, आरोग्य, व्यावसायिक आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांपर्यंत विविध क्षेत्रांत त्यांनी आपले उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दापोली येथे रामराजे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, रामराजे कॉलेज, रामराजे इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई), मराठा मंदिर सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल, आर. आर. वैद्य इंग्लिश मीडियम स्कूल, पालगड येथील साने गुरुजी कला व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय, देवरुख येथील देवरूख इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, मामासाहेब भुवड कॉलेज ऑफ कॉमर्स अँड हॉटेल मॅनेजमेंट, रत्नागिरी येथील रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग आणि चिपळूण येथे रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग या विविध संस्था यशस्वीपणे कार्यरत आहेत.

या सर्व संस्थांमार्फत विद्यार्थ्यांसाठी बी.एस्सी. नर्सिंग, पी.बी. बी.एस्सी. नर्सिंग, जी.एन.एम., ए.एन.एम., बी.पी.टी.एच. (बॅचलर ऑफ फिजिओथेरपी), डी. फार्मसी, बी. फार्मसी, बी.एस्सी. हॉस्पिटॅलिटी स्टडीज, बी.कॉम. अकाउंटिंग अँड फायनान्स, बी.ए.एम.एम.सी., बी.ए., बी.कॉम, बीसीए, बी.एस्सी.आयटी, बीएमएस आणि डी.एड. यांसारखे विविध पदवी, व्यावसायिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा, अनुभवी प्राध्यापक आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती यामुळे या संस्थांनी अल्पावधीतच विद्यार्थ्यांचा मोठा विश्वास संपादन केला आहे.

शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची, समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या अविरत कार्याची दखल घेत पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यापीठाने त्यांना हा सर्वोच्च मानद सन्मान बहाल केला आहे.

या विशेष गौरवामुळे संदीप राजपुरे यांचे नाव राष्ट्रीय स्तरावर अधिक उंचावले असून, कोकणातील शिक्षण क्षेत्रासाठीही हा अतिशय अभिमानाचा क्षण मानला जात आहे.

त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल शिक्षण, सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रांतील व्यक्तींसह माजी विद्यार्थी आणि पालकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.