दापोली : भारत निवडणूक आयोग आणि राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार राबवण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाचे शंभर टक्के कामकाज पूर्ण करण्याचा मान दापोली विधानसभा मतदारसंघाने पटकावला आहे.

हे सखोल पुनरीक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण करणारा दापोली हा महाराष्ट्रातील दुसरा मतदारसंघ ठरला आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) घरोघरी भेटी देऊन मतदार यादीचे पुनरीक्षण केले.

दापोली विधानसभा संघात दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यातील एकूण ३९२ मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदारसंघाची एकूण मतदार संख्या २ लाख ९० हजार ४४७ इतकी असून, त्यामध्ये १ लाख ५१ हजार महिला मतदार, १ लाख ३९ हजार ४४६ पुरुष मतदार आणि एका तृतीयपंथीय मतदाराचा समावेश आहे. सखोल पुनरीक्षण प्रक्रियेअंतर्गत मतदारसंघातील २ लाख ६४ हजार ८१९ म्हणजेच ९१.१८ टक्के ईएफ डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. याशिवाय २५ हजार ६२८ अनकलेक्टेबल ईएफ आणि १० हजार ५ नो-मॅपिंग मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

उर्वरित प्रक्रियेअंतर्गत ३१ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत बीएलओ स्तरावर अनकलेक्टेबल ईएफची फेरपडताळणी करणे, अनमॅप्ड मतदारांचे मॅपिंग करण्याचा प्रयत्न करणे आणि त्रुटी दूर करण्याचे काम केले जाणार आहे. तसेच ईआरओ आणि एईआरओ स्तरावर डिजिटाइझ झालेल्या ईएफची तपासणी केली जाईल.

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार नोंदणी अधिकारी तथा दापोलीचे उपविभागीय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी, दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे, खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे आणि मंडणगडचे तहसीलदार अक्षय ढाकणे यांच्या टीमने हे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले.

याकामी निवडणूक नायब तहसीलदार समीर सावंत, शर्मिला शेवडे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, राजेंद्र आंधळे आणि खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांचे मोलाचे योगदान लाभले.

या यशामध्ये अहोरात्र काम करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा (बीएलओ) मोठा वाटा असून ग्राम महसूल अधिकारी, शिक्षक, केंद्रप्रमुख, पोलीस पाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, महसूल सेवक आणि आयटी टीमच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे काम गतीने पूर्ण होऊ शकले आहे.