दापोली : येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचा सातवा वर्धापन दिन २६ जुलै रोजी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावचे यांनी भूषवले. त्यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय तोरणे, क्रीडा व सहशैक्षणिक उपक्रम संचालक डॉ. ए. व्ही. माने, निम्नस्तर कृषी शिक्षण सहयोगी अधिष्ठाता डॉ. संतोष वरवडेकर आणि उद्यानविद्या महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. गार्गी शिर्के यांनी उपस्थितांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या सातव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात शोभिवंत बागकाम आणि पुष्पप्रदर्शनाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात उपलब्ध साहित्याचा कल्पक वापर करून विविध प्रकारची बागकाम आणि पुष्परचना सादर करण्यात आली.

परिसरातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि नागरिकांसाठी हे प्रदर्शन खुले ठेवण्यात आले होते. या आकर्षक प्रदर्शनाला विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रांतर्गत विद्यापीठाच्या स्वामीनाथन सभागृहात प्रमुख वक्ते व मार्गदर्शक अविनाश वाघ यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘उच्च शिक्षण भविष्यातील सुवर्ण संधी’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या या सत्राला विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद लाभला.

हा वर्धापन दिन यशस्वी करण्यासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. गार्गी शिर्के, डॉ. प्रफुल्ल गाळी, डॉ. राकेश गजभिये, डॉ. नितेश दळवी, डॉ. योगेश परुळेकर, डॉ. महेश कुळकर्णी, डॉ. सुमेद थोरात, डॉ. योगेश सैतवाल, डॉ. सुनील घवाले, डॉ. किरण शिगवण, डॉ. आशिष भुवड आणि स्मिता पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. याव्यतिरिक्त सर्व कार्यालयीन कर्मचारी, प्रक्षेत्र कर्मचारी आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे या उपक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले.