मुंबई: खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मच्छिमारांना अत्याधुनिक सॅटेलाइट फोन उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंत्रालयात करण्यात आला.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच मच्छिमारांना सॅटेलाइट फोनचे वितरण करण्यात आले. मत्स्यव्यवसाय विभाग आणि बीएसएनएल यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाप्रसंगी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे तसेच बीएसएनएलचे अधिकारी उपस्थित होते.
राज्याच्या ‘मच्छिमार सुरक्षा प्रथम’ या धोरणानुसार हा उपक्रम राबविण्यात येत असून यामुळे समुद्रात मोबाईल नेटवर्क नसतानाही मच्छिमारांना किनाऱ्याशी अखंड संपर्क साधता येणार आहे.
या सॅटेलाईट फोनमध्ये इनकमिंग आणि आउटगोइंग अशा दोन्ही प्रकारच्या संपर्काची सुविधा उपलब्ध आहे. मच्छिमारांचे प्राण आणि उपजीविका सुरक्षित ठेवणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत, सॅटेलाईट फोन सुविधा मच्छिमारांसाठी जीवनदायी संपर्क व्यवस्था ठरेल असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी ग्लोबल सॅटेलाईट फोन सर्व्हिसचे (GSPS) सादरीकरण करत समुद्रातील दुर्गम भागात संपर्क कसा राखता येईल याची सविस्तर माहिती दिली. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे खराब हवामान, यांत्रिक बिघाड किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी किनाऱ्यावरून तात्काळ मदत मागवणे सुलभ होणार असून शोध आणि बचाव मोहिमांना वेग येणार आहे.
तसेच हवामानातील बदल आणि सुरक्षा सूचना मच्छिमारांपर्यंत त्वरित पोहोचवणे शक्य होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आणि बीएसएनएलच्या सहकार्यामुळे राज्यातील मत्स्यव्यवसाय अधिक तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सुरक्षित होण्यास मोठी मदत मिळणार आहे.

