दापोली : तालुक्यातील लोकमान्य हायस्कूल, काळकाई कोंड येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने साक्षरतेची वारी सोहळा अत्यंत भक्तीभावात आणि उत्साहात पार पडला.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संस्कृती, भक्तीभाव आणि पर्यावरण जपणुकीचे संस्कार रुजवण्यात आले. मुख्याध्यापिका काजल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ शिक्षक अरविंद वानखडे व इतर शिक्षकांच्या सहकार्याने उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत या साक्षरतावारीचे नियोजन करण्यात आले होते.
शालेय शिक्षण समितीच्या मुख्य पदाधिकारी मालतीताई महाडकर यांच्या हस्ते पालखीतील विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीचे, ज्ञानोबांच्या प्रतिमेचे आणि संविधानाच्या पुस्तिकेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थितांना शिक्षणाचे व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यानंतर शाळेच्या प्रांगणातून प्रभातफेरीला सुरुवात झाली, ज्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी डोक्यावर तुळशीचे रोप, ज्ञानेश्वरी आणि गळ्यात तुळशीमाळ धारण केली होती, तर काहींनी वारकरी वेष परिधान करून टाळ-मृदुंगाच्या गजरात “ज्ञानोबा-तुकाराम” च्या घोषात संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढली.
या प्रभातफेरीदरम्यान “वृक्ष वाचवा, शिक्षण वाचवा”, “व्यसनमुक्ती हाच खरा विठ्ठल”, “पाणी अडवा, पाणी जिरवा” आणि “साक्षरता हीच काळाची गरज” अशा सामाजिक व पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
शाळेच्या पटांगणात विद्यार्थ्यांनी पालखीभोवती सुंदर रिंगण धरून अभंग, विठ्ठलाची भक्तीगीते आणि साक्षरतेचे महत्त्व पटवून देणारी गीते सादर करत वातावरण भक्तीमय करून सोडले. सोहळ्याच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
वारकरी संस्कृती आणि शिक्षणाचा सुंदर संगम साधणाऱ्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शिक्षक अभिनय खोत यांनी विद्यालयाच्या वतीने आभार मानले.

