दापोली : शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर देत गणातील सर्वांगीण विकास साधणार तसेच दापोली तालुक्याच्या ‘व्हिजन दापोली’ला नवे स्वरूप देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन टेटवली गणाचे पंचायत समिती सदस्य निलेश शेठ यांनी केले.
साखळोली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये आयोजित सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते. शाळा हाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया असून ती गावाचे मंदिर आहे, त्यामुळे गावाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तसेच तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी सर्व शिक्षकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैभवी गोरीवले, उपाध्यक्षा सुप्रिया लोवरे, सरपंच दीक्षा तांबे आणि उपसरपंच दिनेश जाधव यांच्या हस्ते निलेश शेठ यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर शाळेच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम आणि शिक्षकांच्या रिक्त पदांची पूर्तता करण्याबाबतचे निवेदन त्यांना देण्यात आले.
या प्रसंगी बोलताना निलेश शेठ यांनी मंत्री योगेश कदम यांच्या माध्यमातून शाळेचे उत्कृष्ट नूतनीकरण झाल्याचे नमूद करत, पुढील काळातही शाळा व गावाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.
चर्चेत मनोज जाधव, दिनेश जाधव, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख पंढरीनाथ देवघरकर आणि उपविभागप्रमुख संदीप नवरत यांनी भाग घेतला.
मनोगत व्यक्त करताना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वैभवी गोरीवले यांनी मंत्री योगेश कदम, पंचायत समिती सदस्य निलेश शेठ आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे शाळेचे नूतनीकरण पूर्ण झाल्याबद्दल आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेला संरक्षक भिंत अत्यंत आवश्यक असून ती लवकरात लवकर उभारण्याची मागणी त्यांनी केली. या कार्यक्रमाला गौरी देवघरकर, मनोज तांबे, शैलेश तांबे, भानुदास पवळे, मनाली आडविलकर, सहशिक्षक समीर ठसाळ आणि संगीता लोहारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक सुरेश पाटील यांनी मानले.

