रत्नागिरी : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ येत्या गुरुवारी (२३ जुलै) रत्नागिरीत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार मंच’ यांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार असून नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आयोजकांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नीटसह विविध शैक्षणिक प्रश्नांवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण आंदोलन केले होते, मात्र या आंदोलनावर पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करत या कारवाईचा तीव्र निषेध करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लोकशाही मार्गाने लक्ष देण्याऐवजी दडपशाहीचा अवलंब केल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. हा मोर्चा सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू होणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. आंदोलन संपूर्णपणे शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने पार पाडण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण व्यवस्था आणि लोकशाही हक्कांच्या संरक्षणासाठी ही लढाई असल्याचे सांगत रत्नागिरीतील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय पक्षांनी पक्षीय भेद बाजूला ठेवून मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.
या मोर्चासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत अभिजीत हेगशेट्ये यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली, तसेच या वेळी रवींद्र कोकाटे, राजू जाधव, बिपीन आयरे, अशोक भाटकर, राजेंद्र कांबळे, बजाज झारी आणि संबंधित महिला आदी उपस्थित होते.

