नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून हा गट एनडीएमध्ये सहभागी होणार का, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या भेटीपूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देऊन आंदोलक आणि जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली होती.
दरम्यान, पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
ती भेट मतदारसंघातील कामांसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण, परिसीमन विधेयकाला पाठिंबा आणि एनडीएमध्ये सहभाग यांसारख्या विविध राजकीय शक्यतांबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

