रत्नागिरी : येथील नाचणे भागात राहणाऱ्या ५९ वर्षीय महिलेचे १३ जुलै २०२६ रोजी दुपारी अल्पशा आजाराने शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे निधन झाले. संबंधित महिलेने फेब्रुवारी २०२५ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे देहदान संकल्पपत्र भरले होते.

त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार १३ जुलै २०२६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले.

हे या महाविद्यालयातील २१ वे देहदान ठरले आहे. मृत महिलेच्या पश्चात मुलगी प्राची सावंत, जावई प्रदीप सावंत आणि नातवंडे असा परिवार आहे. या मरणोत्तर देहदानाच्या वेळी मृत महिलेची मुलगी, जावई आणि इतर नातेवाईक उपस्थित होते.

हे देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यामध्ये शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव आणि शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडिवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, राज पेडणेकर, श्रेयस जोशी, श्रीपाद गांधी व रुग्णवाहिका चालक प्रीतम भोसले यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.

या प्रक्रियेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, अतिदक्षता विभागातील अधिपरिचारिका प्राजक्ता कोरगांवकर आणि सौरभ चित्ते यांचे सहकार्य लाभले.