रत्नागिरी : शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत ७० टक्के व त्याहून अधिक गुण मिळवलेल्या १६ विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने नुकताच विशेष सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी भाजपा शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करणे, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीची माहिती घेणे आणि आवश्यक तेथे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे निलेश आखाडे यांनी स्पष्ट केले.

यावेळी आयोजकांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. करिअरच्या दृष्टीने पुढील शिक्षणाची निवड कशी करावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, शैक्षणिक बाबतीत भविष्यात कोणतीही मदत लागल्यास निःसंकोचपणे संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले.

यावेळी सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, प्रमाणपत्रांसाठी फोल्डर फाईल आणि वह्या देऊन या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला भाजपा शहर सरचिटणीस निलेश आखाडे, पूजा पवार, प्रज्ञा टाकळे, निधी निलेश आखाडे आणि तेजस पवार यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.