रत्नागिरी : रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात एका उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रधान जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव उपस्थित होते. याप्रसंगी बार कौन्सिलचे नवनिर्वाचित सदस्य पारिजात पांडे, उदय वारुंजीकर, विठ्ठल कोंडेदेशमुख, विवेकानंद घाटगे, अहमदखान पठाण, रंजना भोसले आणि माधवी पोतदार यांचा सन्मान करण्यात आला.
प्रधान जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव, रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे आणि उपाध्यक्ष शाल्मली आंबुलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सर्वांना गौरविण्यात आले.
एवढ्या मोठ्या संख्येने बार कौन्सिलचे सदस्य उपस्थित राहण्याची रत्नागिरीच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या मुख्य कार्यक्रमापूर्वी विधी सेवा प्राधिकरण इमारतीच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
प्रास्ताविक भाषणामध्ये रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे यांनी बार कौन्सिलच्या सदस्यांसमोर काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. यामध्ये तरुण वकील सहाय्य निधी, वकील संरक्षण कायदा, वकिलांविरुद्धच्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा, सुरक्षेसाठी दक्षता समितीची स्थापना आणि वेल्फेअर फंड योजना यांसारख्या मुद्द्यांचा समावेश होता.
अध्यक्षीय भाषणात प्रधान जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव यांनी सांगितले की बार असोसिएशन ही वकिलांची मातृसंस्था असून रत्नागिरीतून चांगले न्यायाधीश घडवण्यासाठी बार असोसिएशनच्या सहकार्याने व्याख्यानांचे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत.
कौन्सिलनेही यापुढे असेच सहकार्य सुरू ठेवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांनीही उपस्थितांशी संवाद साधला.
पारिजात पांडे यांनी तरुण वकिलांची वाढती संख्या, वकिली व्यवसायातील तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि महिला वकिलांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा यावर भर दिला.
तसेच कोल्हापूर खंडपीठामध्ये तरुणांसाठी खुले झालेल्या नवीन दालनाचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
उदय वारुंजीकर यांनी स्थानिक वकिलांच्या मागण्या आर्थिक बाबींवर अवलंबून असल्याचे स्पष्ट करत, रुल ४० प्रमाणे वकिलांसाठी निधी उपलब्ध करून यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
विठ्ठल कोंडेदेशमुख यांनी रत्नागिरीतील वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली आणि अपघातग्रस्त वकिलांना अर्ज केल्यास मदत मिळू शकते अशी माहिती दिली.
विवेकानंद घाटगे यांनी कोकणातील वकिलांनी कोल्हापूर खंडपीठात आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले. अहमदखान पठाण यांनी ॲडव्होकेट वेल्फेअर फंडामध्ये दोन रुपयांऐवजी पन्नास रुपयांचे तिकीट घेण्याचा सल्ला दिला, जेणेकरून कनिष्ठ व ज्येष्ठ वकिलांना अधिक आर्थिक मदत करणे शक्य होईल.
रंजना भोसले यांनी महिला वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती कटिबद्ध असल्याचे सांगत महिला वकिलांनी मतदानामध्ये १०० टक्के सहभाग घेण्याचे आवाहन केले. माधवी पोतदार यांनी कोकण ही भूमी संघर्ष आणि संस्कारांचे प्रतीक असल्याचे सांगत महिलांच्या सेवेसाठी कायम बांधील राहण्याचे अभिवचन दिले.
या कार्यक्रमात शाल्मली आंबुलकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर सूत्रसंचालन अवधूत कळंबटे यांनी केले. या कार्यक्रमास रत्नागिरी जिल्ह्यातील वकील, विधिज्ञ आणि बार असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

